Content-Length: 170873 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87

नाणे - विकिपीडिया Jump to content

नाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाणी
नाणी

नाण्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नाणेशास्त्र होय. नाणी व पदके यांचा अभ्यास नाणी , टोकन, कागदी मुद्रा , आणि संबंधित वस्तू समावेश असलेल्या चलनांचा अभ्यास म्हणजे नाणेशास्त्र. अनेकदा नाणेशास्त्र हे जुनी नाणी गोळा करण्याचे छंद म्हणून मानले जातात. परंतु हे एक विस्तृत अभ्यास केले जाणारे शास्त्र आहे. या शास्त्रात विनिमय करण्यासाठी वापरले जाणारे माध्यम समाविष्ट आहे. या शास्त्रात कोणत्याही माध्यमाचा वापर लोकांद्वारे पैसा म्हणून केल्यास त्याचा अंतर्भाव होतो. जसे की एक फिरते चलन (उदा. तुरुंगात सिगारेट). किरगिझ जमातींनी प्रधान चलन एकक म्हणून घोडे वापरले होते. त्या बदल्यात चामड्यांचा वापर केला. म्हणून त्याकाळातील चामडे हे सुद्धा नाणेशास्त्र प्रकारात उपयुक्त असू शकते. अनेक वस्तू अशा कवडी, शिंपले, मौल्यवान धातू , आणि रत्ने अनेक शतके वापरली गेली आहेत. या शास्त्राच्या आधाराने आर्थिक विकास आणि ऐतिहासिक समाजाचे आकलन या प्रमुख बाबी प्रकाशात येता

प्राचीन भारतीय नाणी

[संपादन]

भारतीय नाण्यांचा जन्म इ. स. पूर्व ६ व्या शतकात झाला असे मानले जाते. भारतीय नाण्यांना वर्षांपेक्षा अधिक जुनी परंपरा आहे. काशी, मगध, गांधार, पांचाल, कलिंग या राजवटींनी सर्वप्रथम नाणी पाडली. ही आहत किंवा ठसा पद्धतीने बनवलेली नाणी होती. ही नाणी चौकोनी, गोल, लंबगोल अशा विविध आकारांत बनवली जात असत. ही नाणी चांदीची असत. या नाण्यांवर मनुष्याकृती, पशू-पक्षी, हत्यारे, झाडे तसेच चंद्र-सूर्य चिन्हे आढळतात. मौर्य साम्राज्यात चांदीबरोबरच तांब्याचीही नाणी पाच चिन्हे अंकित करून सुरू केली गेली. याच काळात ठसे ठोकून नाणी पाडण्याऐवजी साच्यात वितळलेला धातू ओतून तयार करण्यास सुरुवात झाली. सर्वात जुनी ओतीवकामाची चौकोनी आणि गोल नाणी सापडली आहेत. भारतात मोहेंजोदडो व हडाप्पा येथील उत्खननात नाणी सापडली आहेत. ही नाणी इ. स. पूर्व ४ थ्या शतकातील सम्राट अशोकाच्या काळातील तक्षशिला येथे सापडली. त्यावर बुद्ध, बोधीवृक्ष, स्वस्तिक अशी नाण्याच्या एकाच बाजूला चिन्हे आहेत. पांचाल राजांनी सर्व प्रथम दोन साचे वापरून नाण्याच्या दोन्ही बाजूंना चिन्हे उमटवली. गांधार राजांनी त्यात कुशलता मिळवली. इंडोग्रीक काळात त्यावर अक्षरे नोंदली जाऊ लागली. कुशाण राजांनी इ. स. पहिल्या शतकात चांदी आणि तांब्याबरोबर सोन्याचे पहिले नाणे पाडले. यांनीच नाण्यांवर संस्कृत भाषेचा प्रथम वापर केला. याच वेळी बाह्मी लिपीचा वापरही दिसून येतो. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील कौसंबी, अयोध्या, मथुरा येथील नाण्यांवर राजांची नावे ब्राह्मी लिपीत आढळतात. गुप्त साम्राज्यात सोन्याच्या नाण्यांत अचूकता आणि विविधता आली. चंद्रगुप्त सम्राटाने काढलेल्या नाण्यांवर त्यांच्यासह राणी कुमारीदेवी आढळते. समुद्रगुप्त सम्राटाच्या नाण्यांवर अश्वमेध, कुऱ्हाड, शिकार करताना वीणावाद्य अशा विविध मुद्रा दिसून येतात. सातवाहनांनी राजा यज्ञ सातकर्णी याने चांदी आणि तांब्याबरोबरच शिशाचीही नाणी पाडली होती. साम्राज्याने सुवर्णहोन प्रचलित केले. शिवकाळात सोन्याचा होन, चांदीची 'लारी' व तांब्याची शिवराई ही प्रमुख नाणी आढळतात. शिवराईवर श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला ‘छत्रपति‘ अशी अक्षरे उमटवलेली असत. शिवाजीच्या काळातील नाणी आजही पहावयास मिळतात.

लिखित नोंदी

[संपादन]

प्राचीन भारतीय साहित्यात नाण्यांचा उल्लेख आढळतो. शतपथ ब्राह्मण, बृहदारण्यक, उपनिषद, अग्निपुराण, मत्स्यपुराण, मनुस्मृती इ. प्राचीन ग्रंथांत, तसेच पाणिनीच्या अष्टाध्यायीत व जातक ग्रंथांतही निष्क, कृष्णल, सुवर्ण, धरण, शतमान, पुराण, द्रम, कार्षापण, रूप्य ही नाणीवाचक नावे आढळतात. भास्कराचार्यांच्या लीलावतीत ‘गघाणक‘ या परिमाणाची माहिती आढळते. लक्षणाध्यक्ष (टांकसाळ प्रमुख) याने रूप्यरूप व ताम्ररूप म्हणजे चांदीची व तांब्याची नाणी बनवावी, असे कौटिलीय अर्थशास्त्रात सांगितले आहे. कूट रूपकारक म्हणजे खोटी नाणी बनवणारा व रूपदर्शक म्हणजे नाणक-परीक्षक यांची माहिती चाणक्याच्या अर्थशास्त्रात आढळते. पाणिनींच्या अष्टाध्यायीत "रूप्य" शब्द (कुठल्याही धातूच्या) चित्र-छापलेल्या नाण्याच्या संदर्भात सांगितलेले आहे. (सूत्र ५.२.१२०)

भारतीय चलनांवरील मराठी पुस्तके

[संपादन]
  • महाराष्ट्रातील चलनाचा इतिहास (पद्माकर प्रभुणे)
  • नाणी संग्रह व संग्राहक (आशुतोष पाटिल)
  • स्वराज्याचे चलन (आशुतोष पाटिल)

तज्ज्ञ

[संपादन]
  • डॉ. मधुकर ढवळीकर - इनामगावाचे उत्खनन हे प्रमुख नावाजलेले कार्य. गुप्त राजांची तर सोन्याची नाणी यावर विशेष संशोधन.
  • नरेंद्र टोळे - यांनी पुण्याच्या कर्वेनगर येथील नटराज सोसायटीमध्ये यशलक्ष्मी न्युमिस्मॅटिक म्युझियम या अद्ययावत संग्रहालयाची उभारणी केली.. यात भारतीय उपखंडातील विविध राजघराण्यांसह जगभरातील दोनशे वीस देशांची अधिकृत नाणी व चलनांचा समावेश आहे. एकूण २३००० नाणी.
  • श्रीराम ( मधुभाई ) राणे - देशीविदेशांतील सुमारे २३०० नाणी आणि १६० चलने यांचा संग्रह.
  • श. गो. धोपाटे - नाणे तज्ज्ञ

हे सुद्धा पहा

[संपादन]








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy