Jump to content

धनादेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धनादेश (इंग्रजीत चेक) हा एका व्यक्तीने किंवा संस्थेने दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला रक्कम अदा करण्यासाठी बँक किंवा इतर वित्तसंस्थेला दिलेला लेखी आदेश होय.

साधारणपणे धनादेश हा बँक किंवा वित्तसंस्थेमार्फतच वटवून त्याचे पैसे करता येतात. धनादेश वटवण्यासाठी समाशोधनाची चेक ट्रंकेशन पद्धत वापरली जाते. धनादेश सहसा विशिष्ट प्रकारच्या आणि विशिष्ट आकारमानाच्या बँकेने पुरवलेल्या छापील नमुना-कागदावर लिहिला जातो.

कागद

[संपादन]

अनेक देशांमध्ये धनादेश लिहिण्याच्या कागदाबद्दलचे संकेत आहेत. असे असताही वित्तसंस्थेने मान्य केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कागदावर धनादेश लिहिला जातो. भारतातील धनादेश लिहिण्याच्या कागदाचे संकेत असे आहेत -

  • धनादेश हा बँकेने पुरवलेल्या छापील फाॅर्मवरच लिहावा.
  • कागदावर पुढच्या किंवा मागच्या बाजूला कार्बनचे मुक्त कण नसावेत.
  • कागद अतिनील किरणनिष्क्रिय असावा, म्हणजे तो अतिनील किरणांमध्ये धरला तर चमकत नाही.
  • कागद बहुधा ९५ जीएसएम (ग्रॅम्स पर स्क्वेअर मीटर) प्रकारचा बाँड पेपर असतो. अशा एक चौरस मीटर कागदाचे वजन ९५ ग्रॅम असते. याच प्रकारचा कागद, करारनामा लिहिण्यासाठीही वापरला जातो. १०० जीएसएम कागद सुद्धा प्रचलित आहे.
  • कागदावर लिहिलेला मजकूर खोडरबराने, ॲसिडने, अल्कलीने, ब्लीचिंग एजंटने किंवा अन्य संद्रिय-असेंद्रिय रसायनाने पुसून बदलता येत नाही.

आकार व आकारमान

[संपादन]
  • धनादेश हा आयताकृती असतो.
  • भारतीय रिझर्व बँकेने सूचित केल्याप्रमाणे धनादेशाची लांबी ८.० ± ०.२ इंच (सुमारे २०२ मिलिमीटर) आणि रुंदी ३.६६ ± ०.२ इंच (सुमारे ९२ मिलिमीटर) असते. कर्णाची लांबी ८.८ ± ०.२ इंच (सुमारे २२० मिमी) असते. धनादेशाच्या तळाशी असलेल्या आडव्या पांढऱ्या एमआयसीआर पट्टीची रुंदी (उंची) ०.५ ± ०.२ इंच (सुमारे १३ मिमी) असते. धनादेशाची रक्कम अंकामध्ये लिहिण्यासाठी असलेला आयत १.५५ X ०.३४ इंच (सुमारे ३९ X ८.५ मिमी) आकारमानाचा असतो.

धनादेशावर चुंबकीय शाईने बँकेचा कोड नंबर, धनादेशाचा अनुक्रमांक, ग्राहकाचा खातेक्रमांक व इतर माहिती छापलेली असते.. मॅग्नॅटिक इंक कॅरॅक्टर रेकग्निशन द्वारे असा मजकूर यंत्राद्वारे वाचला जाऊ शकतो.

सुरक्षितता

[संपादन]

धनादेश हा रक्कम प्रदान करण्याचा आदेश असल्याने या कागदपत्राची सुरक्षितता खालील प्रकारे जपली जाते.

१) बँकेकडे धनादेश पुस्तिकेसाठी विनंती केली असता खातेदाराची सही ताडून बघितली जाते.

२) धनादेश पुस्तिकेचा साठा जबाबदार कर्मचाऱ्याकडे दिला जातो.

३) धनादेश पुस्तिका ग्राहकाच्या ताब्यात देताना अधिकृत व्यक्तीच्याच हाती दिली जाते.

४) धनादेश प्रदान करण्या पूर्वी ग्राहकाची सही, अंकात आणि अक्षरात लिहिलेली रक्कम, तारीख तसेच प्रदान थांबवा सूचना पहिल्या जातात.

५) धनादेशावर खाडाखोड असल्यास रकमेचे प्रदान थांबवले जाते.

६) अतिनील किरणाच्या प्रकाशाखाली धनादेश धरला जातो. जर रासायनिक प्रक्रियेने तपशीलात खाडाखोड केली असेल तर धनादेश प्रदान नाकारले जाते.

७) ग्राहक अंकात लिहिलेल्या रकमेवर पारदर्शक चिकटपट्टी लावून धनादेश सुरक्षित करू शकतो.

प्रकार

[संपादन]

१. बेरर चेक : हा धनादेश धारकाला देय असतो. जो कोणी हा चेक बँकेत सादर करतो त्याला चेकवर लिहिलेली रक्कम मिळते. धनादेशावर नाव लिहिलेलीच व्यक्ती हे पैसे घेत आहे का याच्याशी रोखपालाचा संबंध नसतो. यामुळे अशा प्रकारचा धनादेश असुरक्षित मानला जातो.

२. ऑर्डर चेक : चेकवरचा ज्याचे नाव लिहिले आहे, त्यालाच ओळख दाखवून पैसे मिळतात, असा चेक धनार्थीला देण्यापूर्वी चेकवरच्या बेअरर या शब्दावर काट मारतात.

३. क्रॉस्ड थर्ड पार्टी चेक : चेकच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दोन तिरप्या समांतर रेघा मारून हा चेक धनार्थीला दिला जातो. या चेकची रक्कम त्यावर ज्याचे नाव लिहिले आहे त्याच्या खात्यात किंवा त्याचे त्या बँकेत खाते नसल्यास चेकच्या मागे ज्या तिसऱ्या व्यक्तीला पैसे द्यावेत अशी सूचना असते त्या थर्ड पार्टीच्या खात्यात जमा होते.

४. क्रॉस्ड चेक किंवा अकाऊंट-पेयी कॉस्ड चेक : चेकच्या वरच्या डाव्या कोपऱ्यातील दोन तिरप्या समांतर रेघांमधील रिकाम्या भागात चेकच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात 'अकाऊंट पेयी ओन्ली' असे लिहून हा चेक धनार्थीच्या स्वाधीन केला जातो. या चेकची रक्कम चेकवर ज्याला पैसे द्यावेत असे म्हणले आहे त्याच्याच खात्यात जमा होतात. क्रॉसिंग केलेला धनादेश म्हणजे रोखपालास त्या धनादेशाचे रोख पैसे देऊ नयेत अशी केलेली सूचना.

५. बाऊन्सड चेक : चेक लिहिणाऱ्या खात्यात पैसे नसतील, चेकवरची त्याची सही बँकेत पूर्वीच दाखल केलेल्या सहीशी जुळत नसेल किंवा चेक मुदतबाह्य झाला असेल तर असा चेक ज्याने दिला आहे त्याच्याकडे परत येतो. अशा चेकला बाऊन्स्ड चेक म्हणतात.

pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy